प्रबोधन कार्य

भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात, रणांगणामध्ये युद्धापूर्वी गोंधळलेल्या अर्जुनाला त्याला आप्तेष्टांबद्दल असलेला मोह आणि स्वतःच्या कर्तुत्वावर असलेला अहंकार घालविण्याकरिता आणि  स्वधर्माची ओळख करून देण्याकरिता,  युद्धाचा विचार देखील न करता भगवद्गीतारूपी उपदेश केला आणि अर्जुन त्या गोंधळलेल्या मन:स्थितीमधून बाहेर पडू शकला. अर्जुन स्वभावतः ज्ञानी होता तो     होता भगवान श्रीकृष्ण जे बोलतील तेच व तसेच करायचा.  सुमनु आणि शुद्धमती होता, तरीदेखील ऐन युद्धाच्या प्रसंगी इतक्या महत्त्वाच्या क्षणाला  गोंधळला. आपण सामान्य जीव आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे काय करावे/करू नये हे न कळल्याने अनेकदा गोंधळतो, काय करायचे सुचत नाही. काम, क्रोध, राग, लोभ,  मद,  मत्सर हे षडरिपू व अनेक प्रकारच्या महत्वाकांक्षा अशा अधः पात सामुग्रीच्या आहारी जातो आणि ज्ञानापासून=भगवंतांपासून स्वतःच दूर जातो. तसे होऊ नये  याकरिता ज्ञानात राहणे, सत्संगात राहणे व त्यानुसार आचरण करणे फार गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला त्या गोंधळलेल्या मन:स्थितीतून बाहेर पडता येईल. विवेकपूर्ण आचरण करून आपला स्वधर्म चोख पार पाडता येईल. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी श्रीज्ञानेश्वरीत मोहरूपी शत्रू कितीही बलाढ्य झाला तरी त्याला ज्ञानरूपी खड्गाने तोडता येतो हे सांगितलेय.  ज्ञानशक्तीच्या पुढे कशाचाच टिकाव लागत नाही. 

भगवंत अर्जुनाला म्हणतात, “जरी कल्मषाचा आगरु। तू भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ।। तरी ज्ञानशक्तिचेनि पाडे । हे आघवेचि गा थोकडें । ऐसे सामर्थ्य असे चोखडे।  ज्ञानीं इये ।।’ अ.४ -ओवी १७३-१७४.

पुढे पसायदानात  श्रीज्ञानोबाराय महाराज म्हणतात, ‘जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।।’.   कुठलाही मनुष्य हा पूर्णपणे वाईट नसतो, तर प्रत्येक जीवात थोड्याफार प्रमाणात तरी चांगले गुण असतातच. मनुष्याचे हे कर्तव्य आहे की त्याने या चांगल्या गुणांचे संवर्धन करून आपल्यात असलेले वाईट गुण/दोष कमी करून, प्रगतीच्या दिशेने, स्वतःचा उद्धार करायचाय आणि हे करीत असताना आपला स्वधर्म चोख  पार पडणे हीच अध्यात्मसाधना आहे. म्हणूनच आपला स्वधर्म समजण्याकरिता आपले कर्तव्य निष्काम पद्धतीने पार पाडण्याकरिता, दैनंदिन जीवनात असलेला संघर्ष, दुःख आणि आपल्या दोषांवर जाणीवपूर्वक मात करण्याकरिता ज्ञान असणे आवश्यक आहे.

श्रीगीतेत भगवंतांनी त्यांचे जीवितकार्य सांगताना म्हटले आहे, “मी अविवेकाची काजळी । फेडोनि विवेकदीप उजळी । तै योगियां पाहें  दिवाळी ।  निरंतर ।।”.  अ. ४-ओवी ५४

आपल्याला सर्वांनाच या अविवेकरूपी काजळीला दूर करून आपल्यातील विवेकदीप प्रज्ज्वलित करायचा आहे आणि तो विवेकदीप जागा ठेवण्याकरिताच ज्ञानसेवा प्रतिष्ठानतर्फे आपण प्रबोधनरुपी कार्य हाती घेतले. त्याकरिता आपण दोन प्रकल्प सुरू केले. १) श्रीज्ञानेश्वरी ओवी (क्रमशः) चिंतन वर्ग २) प्रवचन/व्याख्यानसेवा

प्रतिष्ठानबद्दल


कार्तिक कृ.१३ दि.२४ डिसेंबर २०१९ रोजी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी दिन, या महत्त्वपूर्ण तिथीचे औचित्य साधून आपण ‘ज्ञानसेवा प्रतिष्ठान’ ही संस्थेची स्थापना केली. संस्थेचे प्रेरणास्थान आहेत, वै.प.पू.गुरुजी श्री अरविंदनाथ महाराज रनाळकर.

संपर्क

info@dnyansevapratishthan.com
091379 80993/ 7034436132
083693 26995/7045536132

34, लक्ष्मी नारायण, डीएनसी रस्ता, प्रगती महाविद्यालयासमोर, डोंबिवली (पूर्व)