दिव्य ज्ञानपरंपरा

भगवान पूज्यपाद श्रीवेदव्यास महर्षी

भगवान पूज्यपाद श्रीवेदव्यास महर्षी परमात्म्याचे ज्ञानावतार! त्यांनी केलेल्या प्रचंड ज्ञानकार्यामुळे समस्त विश्वाला आदर्श ठरले. त्यांच्यामुळे परमात्म्यापासून आलेले दिव्य अध्यात्मज्ञान आपल्यापर्यंत पोहोचले. वेद-उपनिषदांचे आद्य संकलक-संपादक, वेदान्ताला धरून निर्मिलेले ब्रह्मसूत्र, श्रीमहाभारत या इतिहासग्रंथ महाकाव्याची रचना (त्यातच भीष्मपर्वात श्रीमद् भगवद् गीता अंतर्भूत आहे), महापुराणांची संरचना (ज्यात अंतिम रचना आहे श्रीमद् भागवत्), अशा सर्वश्रेष्ठ ज्ञानसंपदेचे रचनाकार! जणू श्रीव्यास महर्षींनी तत्त्वज्ञान जगतच उष्टावले आहे, “व्यासोच्छिष्ट जगत्रय” असे संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबाराय म्हणतात. त्यांनी पूज्यपाद आचार्यांना बद्रीनाथमधील श्रीव्यास आश्रमात दर्शन देऊन त्यांचा अपमृत्यू निवारून त्यांना वाढीव १६ वर्षाचे आयुष्य प्रदान केले. असे महामना श्रीव्यासमहर्षी आपल्या दिव्यतम ज्ञानपरंपरेत प्रत्यक्षानुभूतीने दाखल झाले, प. पू. गुरुजी श्रीअरविंदानाथजीं यांच्या बरोबरच्या दि. २४ मे ते १४ जून, १९८९ दरम्यानच्या प्रवासात.

श्रीमद् आद्य शंकराचार्य

वेदान्तमार्तंड परिव्राजकाचार्य  श्रीमद् आद्य शंकराचार्य आपले दुसरे ज्ञानादर्श! वयाच्या ८ व्या वर्षी संन्यास घेऊन श्रीगुरुगृही राहून ३ वर्षात सर्व शास्त्र-विद्यांमध्ये पारंगत होऊन बाराव्या वर्षी श्रीगुरुंकडून कृपा मिळविली. वाराणशीत वादसभा जिंकल्या. पुढे ‘उपनिषदे, श्रीमद् भगवद् गीता व ब्रह्मसूत्र’ या  प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिले. ३ वेगळ्या प्रकृतीचे ग्रंथ, प्रत्येकातून एकच प्रतिपाद्य ‘अद्वैत‘ पुरस्कारले.  श्रीव्यास महर्षींनी द्वापरयुगात ज्ञानाचे जे बीज निर्माण करून ठेवले व जपले, ते आचार्य श्रीशंकरांनी पुढील १६ वर्षे हिंदुस्थानात वारंवार परिक्रमा करून हिंदूसमाजाच्या मनोभूमीत पेरले व जोपासले. जे अद्वैत-वेदान्ताच्या विरुद्ध होते, अशांचा पराभव केला. जे विकृत होते त्यांना नेस्तनाबूत केले. ‘शत्रूंवर ज्ञानाने विजय मिळविला’ म्हणून त्यांना ‘वेदान्त डिण्डिम’ हे विशेषण योजतात. वेदान्तमार्तण्ड, परिव्राजकाचार्य श्रीशंकर यांच्या प्राज्ञपूर्ण भाष्यग्रंथनिर्मितीने, अविश्रांत परिक्रमांनी, परमतखण्डन व स्वमतमण्डनाने आव्हानपूर्वक अवैदिकांचा पराभव केला. जे पराभूत झाले, ते एकतर वैदिक बनले किंवा त्यांनी मृत्युदण्ड घेतला किंवा देशत्याग केला. त्यांनी धर्माचे शासन, नियमन करण्यासाठी हिंदुस्थानच्या चारही दिशांना आचार्यपीठे स्थापन केली. त्यातील पहिले पीठ दक्षिणेला शृंगेरी येथे आहे. नंतर पश्चिमेला द्वारका, उत्तरेला बद्रीनाथ आणि पूर्वेस जगन्नाथपुरी येथे अन्य आचार्यपीठे आहेत. भगवान पूज्यपाद श्रीआचार्यांचे आपण अतिशय ऋणी आहोत.

विश्वगुरु श्रीगोरक्षनाथ महाराज

विश्वगुरु श्रीगोरक्षनाथ महाराज नाथ संप्रदायातील सर्वश्रेष्ठ विभूतिमत्त्व! संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांकडे नाथ संप्रदायाचा वारसा श्रीगोरक्षनाथ – श्रीगहिनीनाथ – श्रीनिवृत्तीनाथ – श्रीज्ञाननाथ असा आला आहे. प.पू. गुरुजी श्रीअरविंदनाथ महाराज रनाळकर यांना त्यांच्या वयाच्या साडेपाचव्या वर्षी सप्तशृंग गडावर श्रीगोरक्षनाथ गुरुजींनी दर्शन देऊन सनाथ केले. त्यामुळे हा नाथ संप्रदायाचा वारसा आपल्यापर्यंत आला. प.पू. गुरुजींच्या साक्षात्कारलब्ध ज्ञानानुसार परमात्मा श्रीचौरंगीनाथांनी विश्वगुरु श्रीगोरक्षनाथ गुरुजींच्या माध्यमातून अध्यात्मक्षेत्रातील विकृतींना परास्त करून आध्यात्मिक शुद्धीकरणाचे कार्य केले. देह दोन पण चैतन्य एकच! त्यांचे प्रगटीकरण  गाईच्या  शेणाच्या ढिगाऱ्यातून झाले होते, म्हणून त्यांना ‘गोरक्ष’नाथ म्हटले गेले. योगमार्गातील अशुद्धी, चुकीच्या संकल्पना, सिद्धी-महत्त्वाकांक्षा दूर करून पूर्णत्वाकडे नेणारा कुंडलिनीयोग पुरस्कारला. श्रीगोरक्षनाथांनी अनेक ग्रंथरचना केल्या आहेत. त्यांच्या वाक्यरचनेस “सबदी” म्हणतात. गोरक्षसंहिता, विवेकमार्तंड, गोरक्षशतक, योगबीज, अमनस्कयोग हे त्यांपैकी काही उल्लेखनीय ग्रंथ होत. चौदाव्या शतकातील अमरौघप्रबोध या संस्कृत रचनेचे श्रेयही त्यांना दिले जाते. त्यांच्या उपदेशाचे संकलन “गोरखबानी” या ग्रंथात केले आहे. विश्वगुरु श्रीगोरक्षनाथ आजही अध्यात्मसाधनेत निष्ठेने व निर्धाराने वाटचाल करणाऱ्या साधकाला अनुभूती देतात.

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज – संत मांदियाळीचे अध्वर्यू आणि आत्मसाक्षात्कारी संत! भागवतधर्माचा पाया त्यांनी रचला. निष्काम कर्म, हा त्यांचा जीवनव्यवहार आहे; प्रेमपूर्ण शरणागतीने सर्वस्वे समर्पित होऊन अनन्यगतिक चित्ताने अहेतुकी भक्ती करणे, हा त्यांचा भाव आहे; ‘संतांसवें बैसता योग-ज्ञाने उपासता’ पद्धतीने जगता जगता गुरुकृपेने ‘पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।‘, हे त्यांचे जीवन आहे. अनहंकारवृत्तीने देह-गेह-आप्त यांच्याविषयी अनासक्ती, विषयभोगांविषयी जुगुप्सा म्हणजे वैराग्य, आत्म-अनात्म यांच्यातील श्रेष्ठ, जे आत्म ते सत्य असा विवेक, कृतज्ञता, परोपकार, ही त्यांच्या जीवनव्यवहाराची मूलतत्त्वे आहेत. अष्टमहासिद्धी त्यांची सेवा करतात; पण ते सिद्धींविषयी उदासीन असतात. स्वतःला ते गुरुसमर्पित शिष्य असल्याने ‘श्रीनिवृत्तिदास‘ म्हणवितात. ते ‘योगयोगेश्वरो हरिः‘ असल्याने सर्वज्ञ आहेत. चराचराशी तादात्म्य पावल्यामुळेच त्यांना ‘म्हैषामुखी वेद’ बोलविता आला. ‘समुद्रापैलाडी देखे। स्वर्गीचा आलोचु आईके। मनोगत वोळखे । मुंगियेचें ॥’ या अधिकाराचे प्रज्ञावंत आहेत, म्हणून त्यांनी ‘मेला माणूस जित उठविला’, तेच श्रीसच्चिदानंद बाबा, श्रीज्ञानदेवांचे व्याख्यान ऐकता ऐकता लिहून घेणारे लेखनिक! श्रीज्ञानदेव हे प्रत्यक्ष श्रीमहाविष्णूच आहेत. संत जनाबाई म्हणतात, ‘महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ।।’. लहान सोपान व मुक्ताबाईंचीच नव्हे, तर साऱ्या विश्वाचीच ते माउली आहेत. अनेकांचा त्यांनी उद्धार केला व ते सर्व संतत्वाला पोहोचले.. उदा. भक्त नामदेव, छलक सावकार विसोबा चाटी, अहंकारी हटयोगी चांगदेव. श्रीज्ञानेश्वरीच्या पसायदानातून त्यांनी ‘भजिजो आदिपुरुखी’ म्हणजे परमात्मा श्रीविठ्ठलाची उपासना शिकविली. श्रीज्ञानेश्वरीत ‘विठ्ठल’ नाव नसले तरी, ‘कृष्ण विष्णु हरी गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध। माजि आत्मचर्चा विषद । उदंड गाती॥’, ‘तुज सगुण म्हणो की निर्गुण रे ।.. श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ।।.’ यांतून श्रीहरीच श्रीविष्णु तेच प्रभू श्रीरामचंद्र व तेच भगवान श्रीकृष्ण हे प्रतिपादले. ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ या शब्दांनी सुरू होणाऱ्या श्रीमद् भगवद् गीते खरा अर्थ माउलींनी सांगितला जो आजच्या तरुणाईला जीवनाच्या यशस्वितेसाठीच्या वाटचालीत पथदर्शक ठरतो.

वै.प.पू. गुरुजी श्रीअरविंदनाथ महाराज रनाळकर

वयाच्या साडेपाचव्या वर्षी विश्वगुरु श्रीगोरक्षनाथ गुरुजींचे सप्तशृंग गडावर साक्षात दर्शन व कृपा! त्यानुसार साधनेला सुरुवात. सोबत सामाजिक व शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान. १९८५च्या ललिता पंचमीला साधनापूर्तीनन्तर उरलेल्या लौकिकाचा पूर्णतया त्याग करून उरलेले सर्व आयुष्य “आता उरलो उपकारापुरता” या ब्रीदाने समाजप्रबोधन कार्यात समर्पित केले. संपूर्ण भारतभर स्कूटर व अन्य वाहनांनी अनेकदा प्रवास व कार्यक्रम. श्रीवेदव्यास महर्षी, श्रीमद् आद्य शंकराचार्य, विश्वगुरु श्रीगोरक्षनाथ गुरुजी प्रणित विशुद्ध ज्ञान-योग-भक्ति साधना सर्वदूर पोहोचविणारं आधुनिक युगातील चालते बोलते ज्ञानपीठ! ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीतील सर्वांगसुंदर अध्यात्म, सहज सोप्या शब्दांनी सर्वांपर्यंत नेणारं विलोभनीय व्यक्तिमत्त्व! अध्यात्म हे कोणत्याही अवडंबराच्या, दिखाव्याच्या पलीकडील, तसेच जीवाच्या अंतिम हिताचे शास्त्र आहे, हे आपल्या विनम्र व रसाळ वाणीने उलगडणारे उत्कृष्ट समाजप्रबोधक! प्रचलित सर्व साधनामार्गांचे सार एकत्र करून ज्याचे जसे प्रारब्ध त्यानुरूप ज्ञानसाधना देणारे अलौकिक विभूतिमत्त्व!

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व व नव्य आदर्श

‘भगवान पूज्यपाद श्रीव्यासमहर्षी, आचार्य श्रीशंकर, श्रीगोरक्षनाथजी आणि श्रीज्ञानेश्वर महाराज’ या आपल्या दिव्य ज्ञानादर्शांचे जीवन अलौकिक आहे, हे आपण जाणतो. तद्वतच श्रीनिवृत्तिनाथ, श्रीसोपानदेव, श्रीमुक्ताबाई, श्रीनामदेवराय, श्रीएकनाथ महाराज, श्रीतुकाराम महाराज, समर्थ श्रीरामदास स्वामी व श्रीजनाबाई, श्रीसावता, श्रीदामाजी, श्रीचोखामेळा, श्रीगोरोबा, श्रीकान्होपात्रा आदी संतांची जीवनेही याच पद्धतीने घडलेली आहेत. शिवाय आधुनिक परिव्राजक प्रखर वेदान्ती स्वामी विवेकानंद, नव्य आर्य संस्कृतीचे वेदैकनिष्ठ स्वामी दयानंद सरस्वती आणि विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ हिंदुधर्मसंघटक प.पू. श्रीगोळवलकर गुरुजी यांची चरित्रे त्याच तत्त्वांना धरून साकारली आहेत. तसेच पूजनीय गुरुवर्यद्वय श्री.मामासाहेब दांडेकर व श्री.धुण्डा महाराज देगलुरकर यांनी श्रीज्ञानेश्वरी तत्त्वज्ञानाने समाजप्रबोधनही याच तत्त्वांच्या मुशीतून ओतले आहे. हीच आहे आपली वंदनीय ज्ञानादर्शांची दिव्य परंपरा! संत श्रीगाडगेबाबा व राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज तसेच छत्रपती श्रीशिवाजी महाराज व श्रीमहाराणा प्रताप यासारखे राजे या सर्व महानुभावांची चरित्रे आपण सदैव आपल्या चिंतनाचा विषय बनविली पाहिजेत; त्यांचेच गुणसंकीर्तन केले पाहिजे. संत श्रीएकनाथ महाराजांनी या अर्थाने म्हटले आहे, ‘सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। ऐसी कीर्तनमर्यादा आहे संतांच्या घरची।।’. नुसते चिंतन व कीर्तनच नाही; तर त्यांची शिकवण जीवनात उतरविली पाहिजे; आणि ‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’, न्यायाने तसेच बनले पाहिजे.

प्रतिष्ठानबद्दल

कार्तिक कृ.१३ दि.२४ डिसेंबर २०१९ रोजी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी दिन, या महत्त्वपूर्ण तिथीचे औचित्य साधून आपण ‘ज्ञानसेवा प्रतिष्ठान’ ही संस्थेची स्थापना केली. संस्थेचे प्रेरणास्थान आहेत, वै.प.पू.गुरुजी श्री अरविंदनाथ महाराज रनाळकर.

संपर्क

info@dnyansevapratishthan.com
091379 80993/ 7034436132
083693 26995/7045536132

34, लक्ष्मी नारायण, डीएनसी रस्ता, प्रगती महाविद्यालयासमोर, डोंबिवली (पूर्व)